"माणूस विचारशील प्राणी आहे' फादर फ्रान्सिस दिब्रिटो.

"माणूस विचारशील प्राणी आहे' अशी प्लेटाने माणसाची व्याख्या केली जाते. आपण विचार करू शकतो. तत्त्वचर्चा करू शकतो. कार्यकारणभाव आपल्याला समजतो. म्हणून माणूस स्वतःला श्रेष्ठ समजत आला आहे; परंतु माणूस नेहमी सर्व निर्णय बुद्धीच्या निष्कर्षावर घासून पुसून घेत असतो का? अनेकदा बुद्धीपेक्षा भावनेचाच आपल्यावर अधिक प्रभाव असतो. वरवर जरी तर्कशास्त्राचा हवाला दिला तरी, तर्काच्या मुळाशी भावनांचे जाळे विणले गेलेले असते."माणसाने भावनेच्या आहारी जाऊ नये', असे म्हटले जाते. बुद्धीच्या आहारी गेलेले चालेल; परंतु भावनेच्या नको. का? कारण, बुद्धी श्रेष्ठ आणि भावना कनिष्ठ आहे! तसेच, भावना किंवा विकार यांना माणसाने नैतिकता बहाल केल्यामुळे खूपच अडचण निर्माण झाली आहे. काही भावना चांगल्या आणि काही वाईट अशी वर्गवारी आपण केली आहे. उदा. आनंद, उल्हास, प्रेम या चांगल्या भावना, तर दुःख, विषाद, राग, द्वेष, मत्सर या वाईट भावना. भावना या सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. भावनांना नैतिकता बहाल केल्यामुळे विशेषतः नकारात्मक भावनांमुळे मनात अपराधगंड निर्माण होऊ शकतो. तसेच सातत्याने भावना दडपल्यामुळे मनाला गंभीर जखमा होऊ शकतात.
आधुनिक मानसशास्त्रज्ञ सांगतात की, "Feeling are neither good, nor bad. They just are.'' भावना चांगल्या नसतात किंवा वाईटही नसतात, तर त्या केवळ असतात. एका अर्थाने भावना तटस्थ असतात. त्या न-नैतिक असतात. आपण सारे संवेदनशील आहोत. त्यामुळे मनात सतत भावनांचे तरंग उमटत असतात. माणूस विचारशील आहे, तसा तो विकारशीलही आहे. एक मनुष्य म्हणून ती आपली श्रीमंती आहे.
केवळ स्थितप्रज्ञ अवस्थेत पोचलेली व्यक्तीच भावनांच्या कोलाहलापासून अलिप्त राहू शकते. "ज्ञानेश्‍वरी'मध्ये म्हटल्याप्रमाणे, अशा माणसाचे मन हे निर्वात जागी लावलेल्या वातीसारखे असते. हे सिद्धाचे लक्षण आहे. आपण सामान्य माणसे आहोत. आपले मन नौकेच्या डोलकाठीवर लावलेल्या निशाणासारखे सतत फडकत असते.
मनात कुठली भावना निर्माण झाली हे महत्त्वाचे नाही, तर त्या भावनेला मी कसा प्रतिसाद देतो, काय प्रतिक्रिया व्यक्त करतो, यावर त्या भावनेची नैतिकता अवलंबून असते. म्हणून माणसानं आपल्या भावना ओळखायला शिकलं पाहिजे. भावनांची ओळख पटल्यामुळे त्यांना भिडता येते. उदाहरणार्थ, तुम्ही बसमधून प्रवास करीत आहात. पुढच्या थांब्यावर एक देखणी मुलगी बसमध्ये चढते. अशा वेळी कामवासना जागृत होऊ शकते. त्यामुळे तुमच्या मनात शृंगारिक भावना गर्दी करतात. हे नैसर्गिक आहे. मात्र, आपण ती घोळवत राहिलो, कल्पना रंजनात गुंतलो की मन अस्वस्थ होते. ती नाकारून मनातून निघून जाऊ शकत नाही, उलट ती बळावू शकते.
लैंगिकता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, ही वस्तुस्थिती आपण स्वीकारली पाहिजे. त्यामुळे सुंदर स्त्रीकडे किंवा उमद्या तरुणाकडे पाहिल्यावर मनात "कुछ कुछ होता है', ही गोष्ट सहज आहे. ती व्यक्ती कमनीय आहे, आकर्षक आहे, असे प्रथम मनाला सांगावे, त्याचबरोबर "ती व्यक्ती सुंदर आहे, आकर्षक आहे, तिला प्रतिष्ठा आहे. ती मात्र उपभोग्य वस्तू नाही', असा आपुलाच संवाद आपणाशी करावा. अशा निरामय नजरेमुळे जगात सर्वत्र सौंदर्याचे दर्शन घडते. जीवन अधिक संपन्न बनते.
एखादी भावना आपण ओळखली आणि तिला तिचे नाव दिले म्हणजे तिची तीव्रता कमी होते. मात्र, तिचे अस्तित्वच नाकारले तर ती बळावण्याचा आणि त्यातून विकृतीचा जन्म होण्याचा संभव असतो. राग, संताप, द्वेष, मत्सर या "निगेटिव्ह भावना' आहेत. त्यांना आपण वाईट हे लेबल लावल्यामुळे, त्यांना भिडण्याऐवजी त्या दडपणाचा आपण प्रयत्न करतो; परंतु खाली दाबलेला आगीचा पोत जसा उफाळून वर येतो, तशा या भावना उचंबळून वर येत असतात. खूप वेळा त्या दडपल्यामुळे त्यातून निराळेच प्रश्‍न निर्माण होऊन काट्याचा नायटा होतो.
आणखीन एक उदाहरण घेऊ या. मृण्मयी तुमची मैत्रीण आहे. आज ती मोरपिसी साडी नेसून ऑफिसला आली आहे. सर्वांच्या नजरा तिच्याकडे लागल्या आहेत. तुम्हीही त्याच कार्यालयात कामाला आहात. ती आज आकर्षक दिसते आणि आपले सहकारी तिच्याकडे कौतुकाने पाहात आहेत. हे दृश्‍य पाहिल्यावर तुमच्या मनात कुठली भावना निर्माण होते? कदाचित मत्सराची असेल.
आता काय कराल तुम्ही? एक तर तुम्ही तिच्याकडे ढुंकून पाहणार नाही किंवा शेजारणीला सांगाल, ""कशी नटली आहे बघ.'' तिच्या आकर्षकपणामुळे तुम्हाला कदाचित तिचा हेवा वाटतो. मनातील ती भावना समजून घेण्याऐवजी, तुम्ही कुत्सित उद्‌गार काढता. वास्तविक, मनात मत्सराची भावना निर्माण झाली म्हणून काही आकाश कोसळलेले नसते; परंतु त्यानंतर वरीलप्रमाणे कडवट उद्‌गार काढणे गैर ठरते! ती सुंदर दिसते हे अमान्य करणे, अपमानकारक उद्‌गार काढणे याचा अर्थ तुम्ही मत्सराच्या भावनेचे बळी ठरला आहात.
कदाचित तुम्ही मनाशी म्हणू शकता ः ती आज खूपच आकर्षक दिसते. त्याबद्दल आपल्याला क्षणभर मत्सर वाटला हे खरं आहे. मग तुम्ही तिला मोकळेपणाने सांगू शकता, ""किती देखणी दिसतेस तू या साडीमध्ये !'' याचा अर्थ, मत्सराच्या भावनेला बळी न पडता, तुम्ही तिच्यावर विजय मिळविला आहे. त्यामुळे तुमच्या पदरी एक पुण्यकृत्य पडेल आणि मृण्मयीला आनंद होईल, तो निराळाच. आपण एखाद्या व्यक्‍तीचा मत्सर करतो म्हणजे ती आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, याची आपण पावती देत असतो. मत्सर म्हणजे नकारात्मक दाद असते. इंग्रजीमध्ये त्याला (appreciation in reverse) म्हणतात. मत्सर म्हणजे नकारात्मक दाद असते, हे एकदा ध्यानात घेतले आणि नकाराचे रूपांतर सकारात्मक केले की आपलेही व्यक्तिमत्त्व विलोभनीय होते. इतरांना दाद देण्यासाठी मन आकाशाइतके विशाल असावे लागते. ते अध्यात्माचे एक लक्षण आहे.
कधी-कधी भावनांच्या किंवा विचारांच्या आवर्तात आपण सापडतो. एक प्रकारचा चक्रव्यूह आपण स्वतःभोवती रचत जातो आणि मग त्यात पूर्णपणे अडकून पडतो. गुंत्यात पडू नये म्हणून स्वतःला खालील पाच प्रश्‍न विचारावेत ः
एक उदाहरण घेऊ या. अक्षय आणि मृदुला पती-पत्नी असून, त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. एकदा अक्षय मृदुलासह शॉपिंगला गेला होता. तिथं मृदुलाला तिचा जुना कॉलेज मित्र भेटला. अक्षयबरोबर त्याची ओळख करून देण्याचं भान मृदुलाला राहिलं नाही. ती एकदम संभाषणात गुंतली. त्यांच्या जुन्या आठवणी निघाल्या. अक्षय सारखा घड्याळाकडे पाहत होता. त्याची चुळबुळ पाहून मृदुलाने संभाषण आटोपते घेतले. घरी परतताना अक्षय मृदुलाच्या प्रश्‍नाला कोरडेपणाने उत्तरे देत होता. दोघे घरी पोचली. मृदुलाने स्वयंपाक केला होता. अक्षयचा चेहरा उतरलेला होता.
"काय हो, काय झालं?, तुमचा चेहरा असा काय दिसतो?'' मृदुलाने विचारले.
"काय कुठं काय? छे छे, काहीच नाही'', अक्षयने उत्तर दिले.
"माझं कुठं काय चुकलं की काय?'' मृदुला काकुळतीला येऊन म्हणाली.
"वेडी आहेस गं... छट्‌. ताटं वाढ कशी...'', अक्षयने उडवाउडवी केली. अक्षयच्या एकूण वर्तनाचा आपण पाच प्रश्‍नांच्या मदतीने विचार करू या.
1) माझ्या मनात काय विचार घोळत आहेत?
अक्षय ः ""माझी पत्नी एका परपुरुषाबरोबर इतक्‍या सहजपणे कशी काय बोलते? त्याच्याशी बोलताना ती इतकी का फुलली होती? कॉलेज जीवनात त्यांचे संबंध कसे असावेत? तो तिचा कॉलेज मित्र असला तरी, तिनं इतका वेळ त्याच्याशी का बोलावे? तोदेखील किती जिव्हाळ्यानं तिच्याशी बोलत होता. तिनं मला त्याची ओळख का करून दिली नाही?'' अशा रीतीने अनेक प्रकारच्या विचारांचे भुंगे त्याच्या मनात भुणभुणले असतील.
2) माझ्या हृदयात कुठल्या भावना दाटल्या आहेत?
अक्षय ः या प्रकारावर शांतपणे विचार करताना, अक्षय स्वतःला सांगू शकतो की, माझ्या मनात मत्सराची त्याचप्रमाणे रागाची भावना निर्माण झाली. प्रत्यक्षात त्याने काय केले? त्याने आपल्या खऱ्या भावना दडपल्या. या मनाशी तळाशी जाऊन बसल्या. (दडपलेल्या भावना म्हणजे सापाची अंडी असतात. त्यातून विषारी पिल्लेच निपजणार असतात.)
3) माझे वागणे कसे आहे?
अक्षय ः ""मी चुळबुळ करू लागलो. सारखे घड्याळाकडे पाहिले. तिच्या मित्राने निरोप घेतला तेव्हा मी उसने स्मित दिले. माझ्या मनात गोंधळ निर्माण झाला; परंतु काहीच झाले नाही, असा आविर्भाव मी केला. माझ्या हृदयातील भावना तिने ओळखल्या असतील का? अशी धाकधूक मनाला लागली. त्यामुळे मी अधिकच अस्वस्थ झालो. मात्र, मी ते सर्व हसण्यावरी नेले.'' (ते मृदुलाच्या लक्षात आले.)
4) माझी गरज कोणती आहे?
या प्रश्‍नाचं उत्तर शोधण्याआधी माणसाच्या मुख्य गरजा किती आहेत ते पाहू या.
अ) प्रेम (Love) ब) स्वाभिमान (Selfworth) क) आपुलकी (Belonging) ड) स्वायत्तता (Autonomy).
प्रेम करणे आणि प्रेम करवून घेणे, ही माणसाची मूलभूत गरज आहे. आपल्यावर कुणीतरी प्रेम करतं, आपण कुणाला तरी हवे आहोत, आपल्याला कुणीतरी जपत आहे, आपली कुणीतरी वाट पाहात आहे, ही भावना माणसाला जगण्याचे बळ देते. प्रेम करीत राहणे म्हणजे पूर्णार्थाने जीवन जगणे होय.
माणसाची दुसरी गरज म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा आदर केला जाणे. त्याच्या मताला आणि मनाला जपणे होय. आपण कुणाचे तरी आहोत, कुणीतरी आपलं आहे, ही आपुलकीची भावना आहे.
माणूस स्वातंत्र्यप्रिय आहे. त्याच्या काही सवयी असतात, त्याचे आग्रह असतात, कल आणि मते असतात. त्याचं स्वतःचं असं एक वर्तुळ असतं. काही क्षण त्याला त्या वर्तुळातच घालवायचे असतात. ही स्वायत्ततेची भावना आहे.
या चारांपैकी त्या विशिष्ट परिस्थितीत माझी गरज कोणती होती, हे अक्षयने ओळखणे अत्यावश्‍यक होते. कधी-कधी एकापेक्षा अधिक गरजाही असू शकतात. उदाहरणार्थ- अक्षय स्वतःला सांगू शकतो ः मृदुला माझी आहे. तिच्या प्रेमावर माझाच हक्क आहे. तिच्या कॉलेज मित्राबरोबर ती संभाषणात रंगली म्हणजे त्या प्रेमात कुणीतरी वाटेकरी झाला असा माझा (गैर) समज झाला किंवा, तिनं बोलताना माझी तिच्या मित्राबरोबर ओळखही करून दिली नाही त्यामुळे माझा स्वाभिमान गेला.
5) मी आता काय करू शकतो?
अक्षय ः रात्री झोपताना मी मृदुलाला सर्व सांगणार आहे. ""मृदू, संध्याकाळी तू तुझ्या मित्राशी बोलत असताना माझ्या मनात मत्सरभाव दाटून आले होते. तसेच तू एकटीच त्याच्याशी बोलत राहिलीस. माझी ओळखही करून दिली नाहीस म्हणून मला वाईट वाटले. घरी आल्यावर तू मला प्रश्‍न केलास; परंतु काहीच झालं नाही असा बहाणा मी केला. "तू वेडी आहेस,' असंही मी सांगितलं. वास्तविक मी मत्सराच्या अग्नीत पोळून निघालो होतो आणि मला रागही आला होता...''
आता मृदुला अक्षयला कसा प्रतिसाद देते, हेही महत्त्वाचे आहे.
अनेकदा एकमेकांशी वागताना बचावात्मक किंवा प्रतिक्रियात्मक पवित्रा घेतला जातो. उदा. मृदुलाने सांगितले असते, ""तो माझा वर्गमित्र आहे. मी त्याच्याशी चार शब्द बोलले तर तुला कशाला वाईट वाटले? मला स्वातंत्र्य नाही का?'' हा बचावात्मक पवित्र झाला. अशा वागण्यामुळे अक्षयही तसाच पवित्रा घेईल. शब्दाने शब्द वाढेल आणि प्रकरण हातघाईवरही येईल. मूळ प्रश्‍न तसाच राहील आणि मने दुभंगतील.
समजा, तिने सांगितले असते. ""तसं असेल तर आता यापुढे मी कुणाशीही बोलणार नाही. कुणाशी सहज बोलावं तर तुमचा रुसवा आणि संशय...'' हा प्रतिक्रियात्मक पवित्रा झाला. या भूमिकेमुळे पदरात काहीच पडणार नाही. दोघांच्या मनाचे दरवाजे घट्ट बंद होतील. संवाद तुटेल आणि संबंध कृत्रिमपणाचे होतील.
बचाव किंवा प्रतिक्रिया याऐवजी प्रतिसादाची भूमिका घ्यावी. प्रतिसादामध्ये कुणी कुणाला दोष देत नाही, कुणी कुणाला अपराधी ठरवीत नाही, तर प्रत्येक जण आपल्या भावना प्रामाणिकपणे व्यक्त करतो आणि दुसरी व्यक्ती अत्यंत आदराने त्या भावनांचा स्वीकार करते. त्यामुळे बंद दरवाजे मोकळे होतात, संवाद फुलतो आणि मानवी संबंध आनंदाचे होतात.
प्रतिसादाची भूमिका
प्रतिसाद देण्याची सवय ज्यांना जमते, ते नेहमीच एकमेकांसाठी पारदर्शक असतात. त्यांच्यासाठी अवघा संसार सुखाचा होतो.
मृदुला ः "मी माझ्या जुन्या वर्गमित्राशी बोलत असताना तुझ्या मनात मत्सरभाव निर्माण झाला असं तू म्हणतोस. आपल्या दोघांच्या प्रेमात कुणीतरी भागीदार आलाय असंही तुला वाटलं असावं ना? मी त्याला तुझी ओळख करून दिली नाही म्हणून तुझा स्वाभिमानही दुखावला गेला. बोलण्याच्या ओघात राहूनच गेलं ते. सॉरी. त्यामुळे तू चुळबूळ केलीस, घरी येताना मौन पाळलंस आणि तुझा चेहराही पडला. बरोबर ना? अरे, मी तुझीच आहे ना? वेडा आहेस...'' आणि तिनं त्याला गोड चुंबन दिलं. त्याची कळी खुलली.
मनात आलेली भावना चांगली नसते किंवा वाईटही नसते, ती केवळ असते हे दोघांना पटलं म्हणजे दोघं आपल्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह भावना एकमेकांना सांगू शकतात. त्या भावनांचा प्रेमाने स्वीकार करू शकतात. परस्पर संबंधातील ही सर्वोच्च पायरी आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करताना समोरच्या व्यक्तीवर दोषारोप केला जातो किंवा त्याच्या वागण्यामागचे नसलेले हेतू शोधले जातात. त्यामुळे गैरसमज वाढतात. मनं दुखावतात. प्रतिक्रियांना अंत नसतो. प्रतिसादामध्ये दोष देणं नसतं, तर दुसऱ्या व्यक्तीच्या मनाच्या तळाचा शोध घेऊन, त्या मनात दडलेल्या भावना अचूकपणे टिपल्या जातात व अतिशय हळुवार तसे त्याला/तिला सांगितले जाते. तसेच, आपल्या मनातील भावनाही व्यक्त केल्या जातात. ""तुला असं का वाटलं?'' असे न विचारता, ""सांग, सर्व सर्व सांग. मला सगळं ऐकायचं आहे...'' असे एकमेकांना सांगावं.